(रत्नागिरी / वार्ताहर)
पर्यावरण संवर्धन, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आंतरशालेय ‘कचऱ्यातून कलाकृती’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आठवडा बाजाराजवळील पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे होणार आहे.
दोन तास चालणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. रत्नागिरीतील शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वीचे विद्यार्थी तीन जणांच्या गटातून स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने पुनर्वापर करून आकर्षक तसेच उपयुक्त कलाकृती तयार करणे आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९४०५७७३५२७ / ९९७०४४३१३७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘लहान कल्पना… मोठा बदल!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक विचार, सर्जनशीलता आणि पुनर्वापराची सवय विकसित होण्यास मदत होईल, असे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे यांनी सांगितले.


