(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारताच्या पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. दि आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वेदिक धर्म संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष आध्यात्मिक यात्रेद्वारे भाविकांना दर्शनाचा अपूर्व योग लाभणार आहे.
बुधवार, १८ जून २०२५ रोजी, सायंकाळी ६.०० ते ८.३० या वेळेत अंबर हॉल, टी.आर.पी., रत्नागिरी येथे रुद्रपूजा व दर्शन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर गुरुवार, १९ जून २०२५ रोजी, सायंकाळी ६.०० ते ८.३० या वेळेत मराठा मंडळ हॉल, माळनाका, जिल्हा परिषद जवळ, रत्नागिरी येथे दर्शन सोहळा होणार आहे.
११व्या शतकात आक्रमक मोहम्मद गजनवीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले होते. त्यावेळी अग्निहोत्री ब्राह्मणांनी काही अवशेष सुरक्षित ठेवल्याची नोंद आहे. १९२४ मध्ये कांचीच्या परमाचार्यांनी भविष्यवाणी केली होती की, १०० वर्षांनंतर एक संत येतील आणि त्यांच्याकडे हे अवशेष सुपूर्त करावेत. ही भविष्यवाणी खरी ठरवत, हे पवित्र अवशेष गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे बंगळुरू येथील आश्रमात सुपूर्त करण्यात आले. आज हेच शिवलिंगाचे अवशेष देशभरातील भाविकांसाठी दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात येत आहेत. रत्नागिरीतून या यात्रेची सुरुवात होत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक अभूतपूर्व आणि पुण्यदायी संधी आहे.
सर्व नागरिकांनी या दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि आर्ट ऑफ लिव्हिंग – रत्नागिरी शाखा आणि वेदिक धर्म संस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे.