(रत्नागिरी)
भारतात मधुमेह, ताणतणाव, आत्महत्या, मोबाईल अॅडिक्शन, स्थूलपणा, कर्करोग असे आजार वाढत आहेत. फास्ट फूड, घरातील चौरस आहाराऐवजी अति रासायनिक प्रक्रिया केलेले पॅकबंद खाद्यपदार्थांचे खाण्याचे वाढते प्रमाण यामुळे हे होऊ लागले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात म्हणजे २०४७ मध्ये भारत विकसित होण्याकरिता व स्वास्थवर्धक पिढी होण्याकरिता आतापासूनच प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी भाज्या, फळांचा आहारात भरपूर वापर, व्यायाम व नातेसंबंध जपण्याची गरज असून ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात रविवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई व कार्यकारिणी सदस्य अॅड. सौ. प्रिया लोवलेकर, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित उपस्थित होते. स्वास्थ्य : नवी पिढी-नवी आव्हाने या विषयावर डॉ. किंजवडेकर यांनी उद्बोधक व्याख्यान दिले.
डॉ. किंजवडेकर म्हणाले की, कोविड हा संसर्गजन्य रोग होता. मात्र असंसर्गजन्य आजारही वाढत आहेत. पूर्वी मधुमेह, कर्करोग व हार्ट अटॅक हे आजार ५०-६० च्या पुढील वयोगटात दिसायचे. आज ते ३० वयोगटात दिसू लागले आहेत. मुलांना पहिली दोन वर्षे मोबाईल दाखवू नका, असे सांगूनही पालक ऐकत नाहीत. आता कुटुंबात दोन-तीनच सदस्य असल्याने मुलांना आत्या, मावशी, काका, आजी, आजोबा हे नातेवाइक माहिती नसतात व त्यामुळे त्यांच्याशी भावनिक गुंतवणूक होत नाही. नव्याने पिढीला वाचवायचे असल्यास मुलांना मागितल्याक्षणी लगेच गोष्ट देऊ नका, नाही म्हणायला शिका. त्यांना चांगले शिक्षण द्या.
१९७४ पर्यंत जगभरात सर्वत्र आजारांबाबत सारखे वातावरण होते. त्यानंतर मात्र आक्रमक मार्केटिंग करून खाद्यपदार्थांची मोठी साखळी निर्माण करण्यात आली. त्यातून अनेक प्रकारचे आजार वाढले. साखर, मीठ व मैदा हे शत्रूच आहेत. त्यामुळे ते अत्यल्प खावेत. अति रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाऊच नयेत. कोणत्याही दुकानात, टपरीवर असे पॅकबंद खाद्यपदार्थ विक्रीस असतात. परंतु ते मुलांसाठी घातक आहेत. त्यामुळे पोट साफ होत नाही व आजाराला सुरवात होते. जिभेला एखादी गोष्ट आवडते म्हणजे ती शरीराला आवडतेच असं नाही. त्यामुळे जिभेवरून पदार्थ लगेच पोटात गेला तर तो धोकादायक, त्याऐवजी ३२ वेळा चावून खाल्ला लवकर पचतो. जेवणात ४० टक्के भाज्या, फळांचा वापर करा. सलाडचा उपयोग करा. यातून स्वास्थवर्धक पिढी तयार होईल.
याप्रसंगी अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी डॉ. किंजवडेकर यांचा सन्मान केला. त्यावेळी प्रास्ताविकामध्ये श्री. हिर्लेकर म्हणाले की, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांना संघातर्फे पुरस्कार देतो. महिला, तरुण मंडळींना प्रोत्साहन, कौतुक करणे व त्यांचे काम समाजासमोर यावे असे याचे उद्देश आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या रविवारी हा कार्यक्रम आयोजित करतो. नवी पिढी या कार्यक्रमाला येणाऱ्याकरिता ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे. कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले व उपाध्यक्ष मानस देसाई यांनी आभार मानले. स्वरदा लोवलेकर हिने सुरेल आवाजात संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.
यांना मिळाले पुरस्कार
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार- वैष्णवी फुटक, धन्वंतरी पुरस्कार- डॉ. गजानन केतकर, आदर्श पौरोहित्य पुरस्कार- वेदमूर्ती अनिरुद्ध ठाकूर, आचार्य नारळकर पुरस्कार- प्रज्ञेश देवस्थळी, आदर्श कीर्तनकार पुरस्कार- हभप पुरुषोत्तम काजरेकर, उद्योजक पुरस्कार- प्रशांत आचार्य व हृषिकेश सरपोतदार आणि उद्योगिनी पुरस्कार- सौ. कांचन चांदोरकर व कृषीसंजीवन पुरस्कार- अतुल पळसुलेदेसाई.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी मानले आभार
पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे आभार मानले. श्री. ठाकूर म्हणाले की, प्रत्येकाने आपले कर्तव्य निःस्वार्थी बुद्धीने आणि प्रामाणिकपणे पार पाडावे. श्री. काजरेकर यांनी सांगितले की, कीर्तनाने लोकांना उद्धरावे, वरच्या पायरीवर न्यावे. असे काम गुरुजींच्या कृपेने मी करत आलोय. श्री. देवस्थळी यांनी संघाचा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. किंजवडेकर यांच्या हस्ते मिळाल्याचा सुंदर दुर्लभ योगायोग असल्याचे सांगितले. श्री. आचार्य यांनी माजी विद्यार्थी असल्याने कऱ्हाडे ब्राह्मण संघाची ही वास्तू प्रेरणादायी असल्याचे सांगून अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सांगितले. श्री. सरपोतदार यांनी संघाचे वसतीगृह म्हणजे एक विद्यापीठच असून तेथे ७ वर्षांत भरपूर शिकता आल्याचे सांगून आभार मानले. तसेच सौ. चांदोरकर यांनी आरोग्याचा विचार करूनच खाद्यपदार्थ बनवतो. त्यामुळे आम्ही पदार्थांची निर्यातही नाकारली आहे. महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. श्री. पळसुलेदेसाई यांनी खेड्यात राहून शेती करतो, हे माझ्या आवडीचे काम असल्याचे सांगितले. डॉ. केतकर यांनी आज माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय व मोठा दिवस असल्याने संघाचे आभार मानले. वैष्णवी फुटक ही खो खो स्पर्धेला गेल्यामुळे तिच्या वतीने आईने पुरस्कार स्वीकारला.

