(पुणे / वृत्तसंस्था)
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर महायुतीतील पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा राजकीय तिढा निर्माण झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनीही निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरून मतभेद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे, पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांची नावे आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी यापूर्वी शरद लाड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. त्याचप्रमाणे नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून यापूर्वी दोन नावांची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करणारे सचिन सानप आणि मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती. भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर मंगेश चिवटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगत मंगेश चिवटे यांनी आपली भूमिका मांडली. सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानुसार आपण पुढील भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंगळवारी सकाळी ११ वाजता आपण निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघावरील शिवसेनेचा दावा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी महायुतीतील या जागेच्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. “पुणे शिक्षक मतदारसंघावर आजही आमचा दावा कायम आहे. आमचे उमेदवार मंगेश चिवटे हेच असतील. चिवटे हे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतील, तर भाजपानेही अर्ज भरला आहे. भाजपानं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे; मात्र शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकत्र बसून याबाबतचा अंतिम निर्णय घेतील,” असे मंत्री उदय सामंत म्हणाले.
भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतरही शिंदेंच्या शिवसेनेने पुणे शिक्षक मतदारसंघावरील आपला दावा सोडलेला नसल्याने आता वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंगेश चिवटे यांनीही माघार न घेता पूर्ण ताकदीने आणि भव्य शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीतील ही रस्सीखेच ‘मैत्रीपूर्ण लढती’पर्यंत जाते की वरिष्ठ पातळीवर समझोता होऊन हा तिढा सुटतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील मतदार आपला कौल देणार आहेत. भाजपने दोन्ही जागांवर कोल्हापूरशी थेट कौटुंबिक आणि सामाजिक संबंध असणाऱ्या उमेदवारांना संधी दिल्याने कोल्हापूर या निवडणुकीचा मुख्य राजकीय आखाडा ठरणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून मंगेश चिवटे हेही मोठ्या शक्तिप्रदर्शनासह अर्ज भरणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने उमेदवारी दिलेल्या स्मिता योगेश जाधव यांचे शिक्षण पीएच. डी. (एज्युकेशन), एमबीए (फायनान्शियल मॅनेजमेंट) आणि बीई (कॉम्प्युटर्स) असे आहे. त्या शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून शिक्षणतज्ज्ञ, महिला सक्षमीकरण आणि उद्योग क्षेत्रातील नेतृत्व म्हणून काम करत आहेत. त्या पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव, पुढारी पब्लिकेशनच्या संचालक तसेच टोमॅटो 94.3 एफएम आणि आपलं एफएम 91.9 च्या कार्यकारी संचालक आहेत. त्या कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा आहेत. नवकल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाचा मेळ घालत शिक्षण क्षेत्रात नवे बदल घडवण्यात स्मिता योगेश जाधव यांचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कस्तुरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी १८ हजारांवर महिलांचे नेटवर्क उभारून महिलांना सामाजिक सहभाग, नेतृत्व आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले आहे. वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार, भारत सन्मान निधी पुरस्कार, ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड, एज्युप्रन्योर ऑफ द इयर, बेस्ट सीईओ, आऊटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन आणि प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड आदी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे पेशाने शिक्षक आहेत. नागपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर ते दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांनी नागपूर महानगरपालिकेत पाणीपुरवठा सभापती म्हणूनही काम केले आहे. २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे मात्तबर नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करून ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते.
२०१९ मध्ये पक्षाने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. २०२४ मध्ये पक्षाने त्यांना पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दिली होती. मात्र, आमदार विकास ठाकरे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षाने लगेचच त्यांच्यावर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे नोंदणीप्रमुख आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली.
भाजपकडून या उमेदवारीबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. आता पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीतील दोन्ही घटक पक्षांच्या भूमिकांकडे लक्ष लागले असून मंगेश चिवटे अर्ज दाखल करणार असल्याने पुढील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.


