(रायगड / वृत्तसंस्था)
किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून दरीत कोसळलेल्या ३७ वर्षीय सुयोग पांचाळ याचा मृतदेह ८०० फूट खोल दरीत आढळून आला. सुयोग शनिवारी किल्ले रायगडावर आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि एसव्हीआरआरएस रेस्क्यू पथकाने शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या सहाय्याने टकमक टोकाखाली निजामपूर बाजूच्या सुमारे ८०० फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळला.
सुयोग पांचाळ हा ठाण्यात कुटुंबीयांसोबत राहत होता. तो मूळचा खेडचा रहिवासी होता. शनिवारी रायगडावर आल्यानंतर त्याने पत्नीला टकमक टोकावरील फोटो पाठवून शेवटचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. सुयोगने फोन करून आयुष्याचा शेवट करत असल्याचे सांगितले. आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने घरी फोन करून सांगितल्यानंतर त्याचा फोन बंद केला होता, अशीही माहिती देण्यात आली आहे.
सुयोग बेपत्ता झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्याचा भाऊ सुवेल पांचाळ याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उभी केलेली मोटारसायकल पाहिल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती महाड तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिस आणि बचाव पथकाने शोधमोहीम हाती घेतली.
रात्री अंधार आणि दरीची धोकादायक स्थिती यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले होते. सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी केली असता टकमक टोकाखाली निजामपूरच्या दिशेने असलेल्या सुमारे ८०० फूट खोल दरीत सुयोगचा मृतदेह आढळून आला.
दाट झाडी, खोल दरी आणि उतार यामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. अखेर रेस्क्यू पथक, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला गेला.
पोलिस तपासात सुयोग पांचाळ याने किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास महाड तालुका पोलिस करत आहेत.


