(ठाणे / वृत्तसंस्था)
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौघांचाही जामीन रद्द केल्यानंतर रविवारी (4 ऑक्टोबर) त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश संतोष आगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी केली.
शास्त्रीनगर रुग्णालयातील ही घटना 6 जुलै 2026 रोजी घडली होती. शासकीय रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या परिचारिकांसह डॉ. सृष्टी बावीस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांच्या संघटनांनीही घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांना न्यायालयातून जामीन मिळाला होता. त्यानंतर ते जामिनावर बाहेर होते. मात्र, फिर्यादी डॉक्टरांच्या वतीने या जामीन आदेशाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांचा जामीन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला. या आदेशानंतर रविवारी चौघेही कल्याण जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती संतोष आगे यांच्या न्यायालयात हजर झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन आधारवाडी कारागृहात रवाना केले.
या कारवाईनंतर कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, न्यायालयाच्या निर्णयाचे वैद्यकीय क्षेत्राकडून स्वागत करण्यात आले आहे.


