(पुणे)
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ‘हत्ता जोडी’च्या नावाखाली घोरपडीच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. मल्हार लाला लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून घोरपडीचे सुकवलेले जननेंद्रिय जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाला पुणे रेल्वे स्टेशन परिसरात वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचला. संशयास्पद हालचाल करत असलेल्या मल्हार लोखंडे याची झडती घेतली असता त्याच्याकडे घोरपडीचे सुकवलेले जननेंद्रिय आढळून आले. अंधश्रद्धेच्या बाजारात याची विक्री ‘हत्ता जोडी’ या नावाने केली जात असल्याचे तपासात समोर आले.
‘हत्ता जोडी’ म्हणजे नेमकं काय?
‘हत्ता जोडी’ ही प्रत्यक्षात एका दुर्मिळ वनस्पतीच्या मुळाला दिलेली संज्ञा आहे. हे मूळ दोन हात जोडल्यासारखे दिसत असल्याने त्याला ‘हत्ता जोडी’ असे म्हणतात. ही वनस्पती प्रामुख्याने मध्य प्रदेशातील काही वनक्षेत्रांत आढळते आणि काही लोकांकडून पारंपरिक धार्मिक किंवा ज्योतिषीय उपायांमध्ये तिचा उल्लेख केला जातो.
मात्र, काही भोंदू आणि तस्कर लोकांना फसवण्यासाठी घोरपडीचे सुकवलेले जननेंद्रिय ‘हत्ता जोडी’ म्हणून विकतात. यासाठी घोरपडींची अवैध शिकार केली जाते. या वस्तूला जादूटोणा, धनप्राप्ती, लैंगिक शक्ती वाढवणे किंवा इतर चमत्कारी लाभ होतात, असे दावे केले जातात. मात्र, अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
घोरपड संरक्षित वन्यजीव
घोरपड हा वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षित प्राणी आहे. त्याची शिकार करणे, त्याचे अवयव बाळगणे किंवा विक्री करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. वनविभागाने आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
मोठ्या तस्करी रॅकेटचा तपास सुरू
या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत आहे का, याचा तपास वनविभाग करत आहे. या अवैध व्यापारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. वनविभागाने नागरिकांना अशा अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या खरेदी-विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे.

