(मुंबई)
डिजिटल अरेस्ट, बनावट गुंतवणूक योजना, फौजदारांना मदत, ऑनलाइन शॉपिंग ऑफर आणि क्रेडिट कार्ड सुविधा यांसारख्या आमिषांना वापरून जनतेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. तब्बल 60 कोटी 82 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून, या आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी गेल्या दीड वर्षांपासून देशभरात सक्रिय होती. टोळीतील सदस्य गरजू, आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची निवड करून त्यांच्याकडून त्यांची ओळखपत्रं, बँक कागदपत्रं व मोबाईल सिमकार्ड खरेदी करत. काहीशा रकमेचं आमिष दाखवून या व्यक्तींना तयार करून त्यांच्याच नावे बनावट बँक खाती उघडली जात. ही खाती नंतर ७ ते ८ हजार रुपयांना विकत घेऊन फसवणुकीसाठी वापरली जात.
टोळीने कांदिवली पूर्वेतील सी. जी. कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये “डी. जी. सर्व कन्सल्टन्सी” आणि “प्रिस्टिन लॉजिस्टिक्स प्रा. लि.” या नावाने दोन बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून फसवणुकीचे व्यवहार पार पाडले जात होते. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून २ लॅपटॉप, ९ प्रिंटर, २५ मोबाईल फोन, २५ पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, १०४ सिम कार्ड आणि एक स्वाइप मशीन जप्त केली आहेत.
टोळीने उघडलेली बँक खाती हा प्रकारच धक्कादायक होता. एकूण ९४३ बँक खाती तयार करण्यात आली होती, ज्यापैकी १८१ खाती वापरात असल्याचे आढळले आहे. या खात्यांचा उपयोग ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आणि बनावट व्यवहार दाखवण्यासाठी केला जात होता.
1930 या सायबर हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींवरून या फसवणुकीचा तपास सुरू झाला. एकूण 339 तक्रारींपैकी 16 तक्रारी मुंबईतून, 46 महाराष्ट्रातील इतर भागांतून तर 277 तक्रारी देशभरातून आल्या होत्या. या तक्रारींवर आधारित तपासातून 12 गुन्हे महाराष्ट्रात, तर 33 देशभरातील विविध ठिकाणी दाखल झाले असून काही प्रकरणांमध्ये अजून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, फसवणूक झालेल्या पैशांपैकी सुमारे 17 टक्के रक्कम बँकेने होल्डवर ठेवली असून उर्वरित रक्कम आरोपींच्या बनावट खात्यांमध्ये ट्रान्सफर झाली होती. या प्रकरणात केवळ बँक खाती विकणारेच नव्हे तर त्या खाती टोळीपर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बँक खाती विकणारे बहुतांश लोक हे अत्यंत गरीब, रोजंदारीवर जगणारे होते. कमी रकमेचं आमिष दाखवून त्यांना या फसवणुकीसाठी वापरलं गेलं. या प्रकरणात अजूनही काही आरोपींचा शोध सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईला सायबर गुन्हेगारीविरोधातली एक महत्त्वाची मोहीम आणि मोठं यश मानलं जात आहे. देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत असताना, अशा प्रकारच्या रॅकेट्सवर कारवाई होणं ही काळाची गरज बनली आहे. तुमच्याजवळही अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती असेल किंवा तुम्ही स्वतः बळी पडला असाल, तर त्वरित 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केलेआहे.

