(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
सकाळी अचानक रक्ताची उलटी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीची प्रकृती पुढील उपचारासाठी डेरवण येथे नेत असताना अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ढाक्या रामू राठोड (वय ४८, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाक्या राठोड यांना दारू पिण्याची सवय होती. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना त्यांना अचानक रक्ताची उलटी झाली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून डेरवण येथे नेण्यात येत होते. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक अधिक खालावली.
परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


