(संगमेश्वर / एजाज पटेल)
महिनाभरापूर्वी मोठ्या उत्साहात उबाठा शिवसेनेत प्रवेश केलेले संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि कुणबी समाजाचे प्रभावी नेते दिलीप पेंढारी यांनी अखेर उबाठा सेनेला रामराम ठोकत शिंदे गटाच्या शिवसेनेत दणदणीत प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला असून, त्यामुळे संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
दिलीप पेंढारी हे केवळ पदाचे राजकारणी नसून तालुक्यातील जनतेचा विश्वास जिंकलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पंचायत समितीचे सभापती असताना विकासकामांना गती देत त्यांनी सर्वसामान्यांशी थेट नाते जोडले. समाजकारणात सक्रिय आणि विकासाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका ठेवणारे पेंढारी यांना पुन्हा राजकारणात येण्यासाठी कार्यकर्ते आणि जनतेचा मोठा आग्रह होता.
उबाठा सेनेत प्रवेश करताना पक्षाने पंचायत समितीची उमेदवारी देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. त्या विश्वासावर पेंढारी यांनी माभळे पंचायत समिती गणात संघटन मजबूत करण्यासाठी झपाट्याने काम सुरू केले. घराघरांत संपर्क, कार्यकर्त्यांची बांधणी आणि मतदारांशी थेट संवाद असा त्यांचा दौरा सुरू होता. मात्र ऐनवेळी पक्षाने शब्द फिरवत उमेदवारी नाकारल्याने पेंढारींसह त्यांचे शेकडो समर्थक आणि कार्यकर्ते तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसले.
मेहनत करूनही डावलले जाणे ही उबाठा सेनेची पद्धतच असल्याचा आरोप आता खुलेपणाने होत आहे.
या पार्श्वभूमीवर जनतेच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा विचार करत दिलीप पेंढारी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः त्यांचे स्वागत करत त्यांना योग्य न्याय मिळेल, असा विश्वास दिला. या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला संगमेश्वर तालुक्यात मोठे बळ मिळाले असून, उबाठा सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कुणबी समाजाचे प्रभावी नेतृत्व शिंदे गटात आल्याने आगामी पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता बळावली आहे.
शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते, हे अधोरेखित करत दिलीप पेंढारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता संगमेश्वरचे राजकारण कोणत्या दिशेने वळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

