(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने शिमगोत्सव काळात धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी ग्रुपच्या सदस्यांनी मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथे कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी शैलेश बापट यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावांमधील नागरिक होळी व शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर रेल्वेने प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा, यासाठी ही मागणी करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत संगमेश्वर रोड स्थानकावरील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडत असल्याचे ग्रुपकडून निदर्शनास आणून देण्यात आले. त्याचवेळी फुकट्या प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनामुळे रेल्वेला होणारे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या भेटीत ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, रुपेश मनोहर कदम आणि अशोक मुंडेकर सहभागी झाले होते. कोकण रेल्वे मार्गावरील हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसना संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळाल्यास दररोज हजारोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

