(कोइम्बतूर / वृत्तसंस्था)
सागरी क्षेत्राशी संबंधित गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तहेराला पुरवल्याच्या आरोपावरून भारतीय नौदलातील ३१ वर्षीय नाविक प्रदीप मुखर्जी याला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स (सीआय) सेलने ३ ऑक्टोबर रोजी कोईम्बतूर येथील नौदल नेतृत्व प्रशिक्षण केंद्र आयएनएस अग्रनीमधून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हनी-ट्रॅप’चा वापर झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला प्रदीप मुखर्जी २०१४ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाला होता. त्याची नियुक्ती विशाखापट्टणम येथील ईस्टर्न नेव्हल कमांडमध्ये होती. अटकेच्या वेळी तो कोईम्बतूर येथील आयएनएस अग्रनीमध्ये मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कोर्ससाठी उपस्थित होता. या प्रशिक्षण केंद्रात दाखल होऊन त्याला साधारण एक आठवडा झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी महिला गुप्तचर एजंटने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदीप मुखर्जीशी संपर्क साधला होता. त्यानंतर ऑनलाइन संबंधाचा वापर करून त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. या माहितीमध्ये विशाखापट्टणम येथील नौदल तळावरील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या नौदल मालमत्ता, नौदलाच्या ताफ्याच्या हालचाली तसेच नौदलाच्या कार्यप्रणालीशी संबंधित संवेदनशील माहितीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
नौदल कर्मचाऱ्याशी संबंधित संशयास्पद डिजिटल फूटप्रिंट आणि हालचालींचा माग काढल्यानंतर काउंटर इंटेलिजन्स सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर प्रदीप मुखर्जीवर पाळत ठेवण्यात आली आणि तपास पुढे नेण्यात आला. अखेर ३ ऑक्टोबर रोजी कोईम्बतूर येथील आयएनएस अग्रनीमधून त्याला अटक करण्यात आली.
सीमापार हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या विशेष पथकाने संबंधित जवानाच्या संशयास्पद डिजिटल हालचालींची दखल घेतल्यानंतर तपास सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना समोर येण्याच्या एक दिवस आधी, ४ ऑक्टोबर रोजी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याआधी शनिवारी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी संरक्षण दलातील जवानांना सोशल मीडिया हनी-ट्रॅप आणि डिजिटल हेरगिरीच्या प्रयत्नांपासून सावध राहण्याचा कडक इशारा दिला होता.


