(चिपळूण / निलेश कोकमकर)
चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे सुपुत्र, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा (वरळी)चे विद्यमान कार्यतत्पर सलग तीन वेळा अध्यक्ष तसेच चिपळूण शाखेचे मार्गदर्शक आणि भारत सरकारचे सनदी अधिकारी श्री. चंद्रकांत निर्मळ यांचे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुणबी समाजासह चिपळूण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अत्यंत हुशार, शांत, सर्वसमावेशक आणि नेहमी हसतमुख असलेले श्री. निर्मळ हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व होते. समाजहितासाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. त्यांच्या निधनाने कुणबी समाजाने एक उच्चपदस्थ, अभ्यासू आणि प्रेरणादायी नेतृत्व गमावले असून ही हानी अपूरणीय आहे.
विशेष म्हणजे, दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी चिपळूण शाखेच्या वतीने त्यांना कुणबी समाजाचा ‘मानबिंदू’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अवघ्या दोन दिवसांतच आलेली ही दुःखद बातमी समाजासाठी अधिक वेदनादायी ठरली आहे.
त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे झाल्यानंतर पार्थिव BPT (वडाळा) हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले होते. परदेशात असलेली त्यांची कन्या मुंबईत आल्यानंतर, आज शनिवार, दिनांक १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीपीटी कॉलनी, वरळी येथील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार असून शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने समाजातील एक शांत, समतोल, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. वहाळ पंचक्रोशी, चिपळूण तालुका तसेच विविध स्तरांतून शोकभावना व्यक्त होत असून, कुणबी समाज त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे.

