(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबईला नोकरीसाठी जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना पाय घसरून फलाट आणि धावत्या रेल्वेगाडीमधील पोकळीत पडल्याने अनिल बाळू बांबाडे (वय ३३, रा. शेंबवणे गोमाणेवाडी, ता. संगमेश्वर) गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेमुळे शेंबवणे गावावर शोककळा पसरली आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १.४० वाजता संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर आली होती. मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी निघालेला अनिल बांबाडे हा गाडीत चढत असताना अचानक त्याचा तोल गेला. पाय घसरल्याने तो थेट फलाट आणि रेल्वेगाडीच्या मधील अरुंद जागेत कोसळला. हा प्रकार पाहून स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई बुरकुले यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्टेशन मास्तरांकडून आवश्यक लेखी मेमो घेत त्यांनी वेळ न दवडता खाजगी रिक्षाच्या सहाय्याने गंभीर जखमी अवस्थेतील अनिलला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे दुपारी ३.४० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवघरे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. अनिल बांबाडे हा एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या अकाली निधनामुळे बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शेंबवणे गावात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

