(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घरात चालत असताना अचानक चक्कर आल्याने खुर्चीत बसलेल्या ६३ वर्षीय महिलेने काहीच प्रतिसाद न दिल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. प्रियंका राजू भोंडवलकर (वय ६३, रा. जवे-किरवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रियंका भोंडवलकर यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने कर्ला येथील डॉ. जाधव यांच्याकडे औषधोपचार सुरू होते. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास त्या घरात चालत असताना अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्या खुर्चीत बसल्या. मात्र काहीच बोलत नसल्याचे त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबर देणारे पद्मश राजू भोंडवलकर यांनी त्यांना तातडीने रिक्षाने रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
परकार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे पाठविण्याबाबत लेखी पत्र दिले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १२४/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. घटना ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास परकार हॉस्पिटल, रत्नागिरी येथे घडल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.


