(रत्नागिरी)
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सैतवडे गुंबद येथील लुंबिनी बुद्ध विहारात बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २८ परटवणे बौद्धवाडी, स्थानिक कमिटी आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीमाई फुले आणि माता रमाई आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरीचे प्रशासन अधिकारी संतोष गमरे उपस्थित होते. त्यांच्या समवेत धम्मचारी सत्यसागर आणि सौ. शिंदे मॅडम यांची उपस्थिती होती.
संतोष गमरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या काळात भावी पिढीसमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी आहेत. सोशल मीडिआ आणि दूरदर्शनवरील मालिकांमुळे समाजात काही प्रमाणात असमानता आणि बंधुभाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे समाजात समता, बंधुता आणि मैत्रीभाव रुजवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन कार्य करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले आणि माता रमाई आंबेडकर यांचा संघर्षमय आदर्श महिलांनी आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. या विचारांची सुरुवात घरापासून, वाडी-गावातून आणि समाजातून झाली तर समाजात मानवता, समता आणि बंधुता नक्कीच रुजेल आणि आदर्श समाज घडण्यास हातभार लागेल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला अध्यक्षा दिपिका जाधव होत्या. यावेळी स्थानिक कमिटीचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष शशिकांत सावंत, नवनिर्वाचित वाटद जिल्हा परिषद सदस्या सौ. उषा राजेश सावंत, गुंबद-सैतवडेचे उपसरपंच मुनाफ वागळे, बानू खलपे, सैतवडेचे उपसरपंच सुवेश चव्हाण तसेच माजी सरपंच सौ. संज्योत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सैतवडे परटवणे बौद्धवाडी, जयभीमनगर आणि जांभारी बौद्धवाडी येथील मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. मयुरी सुर्वे यांनी केले.

