(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढणाऱ्या कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तंबाखूमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बाह्यरुग्ण विभागात उपस्थित नागरिकांना तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे यांनी तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढत असल्याचे सांगितले. निरोगी आणि गुणवत्तापूर्ण जीवनासाठी तंबाखूपासून संपूर्णपणे दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते सचिन भरणे यांनी जागतिक तंबाखू निषेध दिनाचे महत्त्व स्पष्ट करत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली. विशेषतः युवकांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी न जाता आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक प्राची भोसले यांनी मौखिक कर्करोगाच्या लक्षणांबाबत तसेच वेळेवर निदान आणि उपचारांच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालयामार्फत उपलब्ध असलेल्या मौखिक कर्करोग तपासणी, निदान, उपचार आणि तंबाखूमुक्ती समुपदेशन सुविधांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
तंबाखूमुक्तीच्या दिशेने रत्नागिरी जिल्ह्याने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८७ हजार ८६२ नागरिकांचे तंबाखूमुक्तीसाठी समुपदेशन करण्यात आले असून अनेकांनी तंबाखूमुक्त जीवनाचा स्वीकार केला आहे. याशिवाय २ हजार ८४५ आरोग्य शिबिरांमधून ७१ हजार ४२५ नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासण्यांदरम्यान १ हजार ३५९ व्यक्तींमध्ये मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. त्यापैकी १४७ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निदान करण्यात आले असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध करणाऱ्या कोटपा (COTPA) कायदा २००३ अंतर्गत जिल्ह्यात सातत्याने कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याप्रकरणी २ हजार ५१८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून २ लाख ८९ हजार २३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या १५४ दुकानांवर कारवाई करून ३० हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरएमओ डॉ. अंकुश शिरसाट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, एनसीडी समुपदेशक रामेश्वर म्हेत्रे आणि एनपीसीबी समुपदेशक राम चिंचोळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी, “तंबाखूमुक्त जीवन हाच निरोगी जीवनाचा पाया आहे. तोंडातील जखम, पांढरे डाग, गाठ किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन केले.

