(मंडणगड/ रत्नागिरी)
शिगवण ढाब्यावर कुक म्हणून काम करत असताना सिडीवरून पाय घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मुंबईतील केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. राजेश बबन तांबे (वय ४५, रा. वलोते, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
राजेश तांबे हे मागील चार वर्षांपासून मंडणगड येथील शिगवण ढाब्यावर कुक म्हणून काम करत होते. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ढाब्यावर काम करत असताना सिडीवरून त्यांचा पाय घसरला. यावेळी खाली पडल्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर मार लागला आणि ते बेशुद्ध झाले. या घटनेनंतर ढाब्याचे मालक वल्लभ शिगवण यांनी त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे निदर्शनास आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.
त्यानंतर २ सप्टेंबर रोजी सकाळी ६.२३ वाजता राजेश तांबे यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचार सुरू असतानाच ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद मंडणगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १७/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


