(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी संतोष भिकाजी गमरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. प्रशासकीय कामकाजातील अनुभव, कार्यालयीन प्रक्रियेची जाण आणि जबाबदारी हाताळण्याची क्षमता यामुळे गमरे यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे. कृषी विभागातील नियमित जबाबदारी सांभाळतानाच सामान्य प्रशासन विभागातील महत्त्वाच्या कामकाजाला गती देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी सुरेंद्र तानाजी खाडे हे नियत वयोमानानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले. विभागातील कामाची व्याप्ती आणि रिक्त पदांची स्थिती लक्षात घेऊन प्रशासकीय कामकाजात खंड पडू नये, यासाठी गमरे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गमरे यांच्याकडे कृषी विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाची जबाबदारी कायम राहणार असून, त्यासोबतच सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना सांभाळावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या प्रशासकीय विभागांतील कामकाजाचा समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
दरम्यान, अतिरिक्त कार्यभार स्वीकारताना विभागातील प्रलंबित कामांना प्राधान्य देत प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गमरे यांच्याकडे सोपविण्यात आलेली ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या कार्यक्षम प्रशासकीय हाताळणीवरील वरिष्ठांचा विश्वास अधोरेखित करणारी मानली जात आहे. गमरे यांचे वेतन व भत्ते मात्र कृषी विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयामार्फत अदा करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


