(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था, जागोजागी पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यातच जुन्या वाहनांबाबत ई-२० पेट्रोलच्या वापरामुळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी या सगळ्याचा फटका सध्या दुचाकीस्वारांना बसताना दिसत आहे. पेट्रोल भरा, विमा भरा, वाहनाची कागदपत्रे सांभाळा आणि त्यावर वारंवार दुरुस्तीचा खर्च करा… सामान्य वाहनचालकाने हा सगळा भार पेलायचा तरी कसा? असा प्रश्न दुचाकीस्वारांसमोर उभा ठाकला आहे. त्यात वाहनांच्या दुरुस्तीचा वाढता खर्च आणि महागडे सुटे भाग यामुळे वाहनधारकांच्या खिशाला आणखी झळ बसत आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात फेरफटका मारला असता विविध दुचाकी दुरुस्ती केंद्रांमध्ये जुन्या वाहनांची कामे करून घेण्यासाठी वाहनधारकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. इंजिन, इंधन प्रणाली तसेच इतर भागांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी दुचाकी मेकॅनिककडे वाहनांची संख्या वाढल्याचे वाहनचालकांकडून सांगितले जात आहे. परिणामी, रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनधारकांना हैराण केले असतानाच आता दुरुस्तीच्या खर्चाचा ‘खड्डा’ही त्यांच्या खिशात पडत आहे. रोजंदारीवर काम करणारे, नोकरदार किंवा मर्यादित उत्पन्न असलेले वाहनधारक या अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक अडचणीत येत आहेत. ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत जुन्या वाहनांच्या मालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ई-२०मुळेच वाहनांमध्ये बिघाड होत असल्याचा थेट निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी, काही वाहनधारक आपल्या जुन्या दुचाक्यांमध्ये वारंवार कामे निघत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढल्याची भावना त्यांच्यात आहे.
एकीकडे पेट्रोलचे दर, दुसरीकडे वाहनांचे वाढते देखभाल खर्च आणि त्यात सुट्या भागांच्या किमती. त्यावर मेकॅनिकची मजुरीही वाढल्याने दुचाकीस्वारांच्या बजेटचे गणित बिघडले आहे. वाहन रस्त्यावर काढले की खड्ड्यांची भीती आणि गॅरेजमध्ये नेले की बिलाची धास्ती, अशी काहीशी अवस्था वाहनधारकांची झाली आहे. वाहनधारकांच्या तक्रारी वाढत असताना दुसरीकडे दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकच्या व्यवसायाला मात्र सध्या कामाची कमतरता नसल्याचे चित्र आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने ‘अच्छे दिन’ नेमके वाहनधारकांचे की मेकॅनिकांचे? असा उपरोधिक सवालही उपस्थित होत आहे.


