(रत्नागिरी /प्रतिनिधी)
छातीत दुखत असल्याने प्रकृती अस्वस्थ झालेल्या ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सुलोचना सुभाष लोखंडे (वय ६५, रा. चांदेराई लोखंडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलोचना लोखंडे यांना छातीमध्ये दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, चांदेराई येथे उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी त्यांना अधिक उपचारांसाठी सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक ७९/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजता सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे घडली. त्यानंतर पहाटे २.२१ वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली.

