(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील नाचणे, सहकार नगर येथील रहिवासी विजय सोनू पांचाळ (वय ४३) हे बेपत्ता झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय पांचाळ हे ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता दुर्वांकुर अपार्टमेंटसमोरील परिसरातून श्री. माने यांच्या येथून निघून गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
बेपत्ता विजय पांचाळ यांची उंची सुमारे पाच फूट असून, त्यांचा रंग सावळा आणि बांधा सडपातळ आहे. त्यांचे नाक सरळ असून, केस काळे आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. बेपत्ता होताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ बरमुडा परिधान केली होती.
या वर्णनाची व्यक्ती कुठे आढळल्यास किंवा विजय पांचाळ यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


