(चिपळूण /रत्नागिरी)
गावातील रानातील वाटेवर ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आल्याने ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्रशांत अशोक घाग (वय ४५, रा. गुळवणे-सदानंदवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गुळवणे गावच्या पोलीस पाटील सौ. सोनल प्रभाकर घाग यांना गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांनी प्रशांत घाग हे गावातील रानातील दंडाच्या ठिकाणी वाटेत पडलेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील सोनल घाग यांच्यासह सहास बेटकर आणि वैशाली बेटकर हे दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. यावेळी प्रशांत घाग हे उजव्या कुशीवर, तोंड जमिनीच्या दिशेने करून पडलेले दिसून आले. त्यांच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने तोंडावर पाणी मारून तसेच त्यांना हलवून पाहण्यात आले. मात्र, शरीर कडक झाल्याचे आणि श्वासोच्छ्वास सुरू नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्रशांत घाग यांना रुग्णवाहिकेतून कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २४/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.४५ वाजण्यापूर्वी, नेमकी वेळ समजू शकलेली नसताना गुळवणे येथील रानातील दंडाच्या ठिकाणी ही घटना घडल्याची नोंद आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


