(मुंबई / वृत्तसंस्था)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना विविध पथकर नाक्यांवर पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसनाही या पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (रा.म. ४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म. ६६), सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणात जाणारे रस्ते आणि नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूमार्गावरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू राहणार आहे.
पथकरमाफीसाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टिकर स्वरूपातील पास देण्यात येणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस आणि संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या समन्वयातून आवश्यक संख्येने हे पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हे पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरले जाणार आहेत.
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ज्या बसेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कोकणाकडे रवाना होणार आहेत, त्या जिल्ह्यांतील पोलीस विभाग किंवा प्रादेशिक परिवहन विभागाकडेही हे पथकरमाफी पास उपलब्ध करून देण्यात येतील. गौरी-गणपती वाहतुकीसाठी संबंधित जिल्ह्यातून रवाना होणाऱ्या एसटी बसेसना पथकरमाफीचे पास लावून त्या मार्गस्थ करता येणार आहेत.
ग्रामीण किंवा शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या पासच्या संख्येबाबतची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप सचिवांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या काळात पासची सुविधा आणि त्यांची उपलब्धता याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यकतेनुसार अधिसूचना किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. परिपत्रक राजेश पां. भोगले, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.


