(चिपळूण / वार्ताहर)
स्वामी चैतन्य आर्केड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या वतीने संस्थेच्या आवारात अग्निसुरक्षेबाबत विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी अग्निशामक यंत्राचा योग्य वापर, आग नियंत्रण (Fire Mitigation) तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या प्राथमिक खबरदारीबाबत महिलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
संस्थेतील महिला सभासद आणि रहिवाशांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रात्यक्षिकात आग लागल्यास परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणती प्राथमिक खबरदारी घ्यावी, आगीच्या प्रकारानुसार योग्य अग्निशामक यंत्राची निवड कशी करावी आणि ते सुरक्षित व प्रभावीपणे कसे हाताळावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रत्यक्ष अग्निशामक यंत्र हाताळण्याचा अनुभव घेतला.
M/s Sidven Engineering यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः घरातील महिलांना घाबरून न जाता आत्मविश्वासाने आणि योग्य पद्धतीने प्राथमिक प्रतिसाद देता यावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
संस्थेच्या संचालक मंडळाने अग्निसुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन घेतलेल्या तत्पर निर्णयातून या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रहिवाशांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने हे प्रात्यक्षिक महत्त्वपूर्ण ठरले.


