(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात शिक्षकांची तब्बल १,०२७ पदे रिक्त असताना शासनाने यापैकी केवळ ४७८ पदांच्या भरतीला परवानगी दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही २० उमेदवार रुजू न झाल्याने प्रत्यक्षात ४५८ शिक्षकांचीच नियुक्ती झाली. विशेष म्हणजे या भरतीत स्थानिक उमेदवारांच्या वाट्याला अवघ्या ७० जागा आल्याने जिल्ह्यातील डीएड, बीएड पात्र बेरोजगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सध्या १,५०० हून अधिक डीएड, बीएड पात्र उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे शिक्षकांची हजारावर पदे रिक्त असताना दुसरीकडे उपलब्ध रिक्त पदांच्या निम्म्यापेक्षाही कमी पदांची भरती होत असल्याने शैक्षणिक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. १,०२७ रिक्त पदांपैकी केवळ ४५८ पदे भरल्यानंतरही ५६९ पदे रिक्तच राहिली आहेत. शिक्षक भरतीतील रिक्त पदांचा प्रश्न नवा नाही. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात ८०० हून अधिक पदे रिक्त असतानाही केवळ २४६ पदांची भरती करण्यात आली होती. उर्वरित पदे पुढील टप्प्यात भरण्यात येतील, असे त्यावेळी सांगण्यात आले. मात्र, हा पुढील टप्पा अद्याप प्रत्यक्षात न आल्याने रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. परिणामी काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता तीव्र झाली असून, एकशिक्षकी शाळांपुढेही मनुष्यबळाचे आव्हान उभे राहिले आहे.
मागील भरतीप्रमाणे यंदाही स्थानिक उमेदवारांच्या वाट्याला तुलनेने कमी जागा आल्याचे चित्र आहे. मागील भरतीत एकूण नियुक्त्यांपैकी मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील उमेदवारांची निवड झाली होती, तर रत्नागिरीतील केवळ ४८ उमेदवारांना संधी मिळाली होती. यंदाच्या भरतीतही स्थानिक उमेदवारांची संख्या ७० वरच राहिली आहे. दरम्यान, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या मागील भरतीतील काही शिक्षक सध्याच्या भरती प्रक्रियेचा लाभ घेत आपल्या मूळ जिल्ह्यात परतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बनावट रहिवासी दाखल्यांच्या आरोपांचे काय?
स्थानिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या रहिवासी निकषांच्या संदर्भात मागील भरतीदरम्यान १५ वर्षांच्या वास्तव्याचे कथित बनावट दाखले सादर केल्याचे प्रकार समोर आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली होती. मात्र, चौकशीचा पुढील अहवाल आणि संबंधितांवर झालेल्या कारवाईबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
५६९ पदे अद्याप रिक्त
४७८ पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी कागदपत्र पडताळणी आणि अन्य कारणांमुळे २० उमेदवार रुजू झाले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष नियुक्तीचा आकडा ४५८ वर आला. परिणामी जिल्ह्यातील १,०२७ रिक्त पदांपैकी ५६९ पदे अद्याप भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षकांची रिक्त पदे, स्थानिक पात्र उमेदवारांना मिळणाऱ्या मर्यादित संधी आणि रखडलेला पुढील भरती टप्पा या तिन्ही बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व रिक्त पदे टप्प्याटप्प्याने नव्हे, तर आवश्यकतेनुसार भरावीत, अशी मागणी पात्र उमेदवारांकडून होत आहे.


