(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात शेअर रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची संतापजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मुंबईहून आलेल्या प्रवाशाला रिक्षाचालकासह अन्य दोन प्रवाशांनी मिळून बेदम मारहाण केल्याने प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गजानन पांडूरंग पेर्वी (वय ४९, रा. पेण, जि. रायगड) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. शनिवारी (ता. १४) सकाळी साडेआठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेर्वी हे शुक्रवारी रात्री मुंबईहून रत्नागिरीत आले होते. उशीर झाल्याने त्यांनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. शनिवारी सकाळी ते आठवडा बाजार येथे जाण्यासाठी शेअर रिक्षा स्टँडवर गेले असता, संबंधित रिक्षाचालकाने प्रति प्रवासी ५० रुपये भाडे सांगितले. पेर्वी यांनी आपल्याकडे केवळ ३० रुपये असल्याचे सांगताच वादाची ठिणगी पडली. या वादातून रिक्षाचालक आणि रिक्षेतील अन्य दोन अज्ञात प्रवाशांनी पेर्वी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रसंगावधान राखत तेथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने हस्तक्षेप करून पेर्वी यांची सुटका केली आणि त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, किरकोळ भाडे वादावरून प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर लगाम घालण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांच्या दबंगगिरीला लगाम कधी?
भाड्यावरून प्रवाशाला मारहाण झाल्यानंतर रिक्षाचालकांच्या वाढत्या मनमानीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या शेअर रिक्षा सेवेत काही चालकांकडून दाखवली जाणारी दबंगगिरी आणि मनमानी भाडेवसुली प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नियमाप्रमाणे भाडेदर निश्चित असताना त्यापेक्षा जादा आकारणी, प्रवाशांशी चुकीचे वर्तन, तसेच काहीवेळा थेट मारहाणीपर्यंत मजल जाणे, हे प्रकार चिंताजनक आहेत. त्यामुळे आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) या प्रकरणात ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. परवाना निलंबन, दंडात्मक कारवाई, भाडेदरांचे स्पष्ट फलक सक्तीने लावणे, तसेच अचानक तपासण्या अशा उपाययोजना राबविल्याशिवाय परिस्थितीत सुधारणा होणार नाही, असेही मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण झालेल्या या पार्श्वभूमीवर RTO अधिकारी दबंगगिरी करणाऱ्या चालकांवर खरोखरच लगाम घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

