(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा आज गुरुवार, ३ सप्टेंबरपासून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण चौधरी यांनी दिली.
गणपतीपुळे समुद्रकिनारा समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन मागील दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता. तब्बल ६० दिवसांनंतर गेल्या आठवडाभरापूर्वी हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, गणपतीपुळे समुद्राची धोकादायक स्थिती अद्याप कायम असल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार समुद्रकिनारा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समुद्रकिनारा मागील दोन महिने बंद असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत बीच सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने सुमारे आठवडाभरापूर्वी गणपतीपुळे समुद्रकिनारा सुरू केला होता. मात्र, बीच सुरू होऊन दहा दिवस होत असतानाच तो पुन्हा बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या आठवडाभरापूर्वी गणपतीपुळे बीच सुरू झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा समुद्रकिनारा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

