(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना महामार्गाला संगमेश्वर शहरासह विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची मात्र अक्षरशः वाट लागली आहे. माभळे परिसरातील जोडरस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, चिखल आणि उखडलेले रस्ते यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. आंदोलनाचा इशारा देऊनही ठेकेदार कंपनीकडून केवळ खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने ‘महामार्ग चकाचक; जोडरस्ते खड्ड्यात’ असे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे.
महामार्गाच्या कामासाठी माती, खडी, बांधकाम साहित्य आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्याचा थेट भार गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर पडत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. परिणामी आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. काही ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आवाज उठविल्यानंतर ठेकेदार कंपनीने काही ठिकाणी खडी टाकण्याची कार्यवाही केली. मात्र, खड्डे बुजविण्याऐवजी खडी टाकून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार किती दिवस चालणार?, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. पाऊस आणि अवजड वाहतुकीमुळे काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था होत असल्याने तात्पुरत्या डागडुजीपेक्षा कायमस्वरूपी डांबरीकरणाची मागणी जोर धरत आहे.
महामार्गाचे काम सुरू असताना त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जोडरस्त्यांची देखभाल करणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराची जबाबदारी असताना नुकसान होईपर्यंत प्रशासनाची प्रतीक्षा आणि तक्रारीनंतर केवळ खडीची मलमपट्टी, ही कार्यपद्धती कितपत योग्य? असा सवालही उपस्थित होत आहे. महामार्गाच्या कामाचा फटका केवळ वाहतुकीलाच बसला नसून माभळे येथील स्मशानभूमी आणि गणेश विसर्जन घाटाच्या सुविधांवरही परिणाम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली असतानाही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजांशी निगडित स्मशानभूमी आणि विसर्जन घाटही दुर्लक्षित राहणार असतील, तर विकासकामाच्या नावाखाली नेमके कोणाच्या सोयीचा विकास सुरू आहे?, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
महामार्गाच्या कामामुळे माभळे परिसरातील शेतकऱ्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे. शेतीकडे जाणारे मार्ग, पाण्याचा निचरा आणि वाहतुकीच्या अडचणी यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामामुळे बाधित झालेल्या मार्गांची पाहणी करून शेतकऱ्यांचे नुकसान निश्चित करावे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि पात्र नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने केवळ मुख्य महामार्गाच्या कामाकडे लक्ष न देता त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जोडरस्त्यांचीही जबाबदारी स्वीकारावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जोडरस्ते, स्मशानभूमी, विसर्जन घाट तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रत्येक कामाचे वेळापत्रक जाहीर करा; काम कधी सुरू होणार आणि कधी पूर्ण होणार, हे स्पष्ट करा, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला असतानाही प्रश्न कायम असल्याने ठेकेदार कंपनीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. त्याचवेळी, महामार्गाच्या कामामुळे स्थानिक रस्त्यांची होणारी वाताहत प्रशासनाच्या नजरेस पडत नसेल, तर देखरेख नेमकी कोण करीत आहे?, असा सवालही आता उपस्थित होत आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण विकासासाठी आवश्यक असले, तरी त्या विकासाची किंमत स्थानिक ग्रामस्थांनी खड्डे, धूळ, वाहतुकीची कोंडी आणि मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेच्या रूपाने मोजावी, अशी अपेक्षा नसते. त्यामुळे तक्रारीनंतर खडी टाकण्याची तात्पुरती मलमपट्टी न करता माभळे परिसरातील जोडरस्ते आणि अन्य प्रभावित सुविधांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची वेळ येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


