(रत्नागिरी)
कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सोमवारी भक्तीचा महासागर उसळला. पहाटेपासूनच विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांनी ‘पांडुरंग’ाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी मंदिरात मोठ्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर ‘प्रति पंढरपूर’ बनला होता.
भक्तिरसात न्हालेल्या या वातावरणात कीर्तन, भजन आणि नामस्मरणाचा अखंड जयघोष घुमत होता. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने आयोजित भजनांचे सत्र रविवारी सायंकाळपासूनच सुरू झाले असून, प्रदेशातील नामांकित भजन मंडळांनी आपली कलाकृती सादर केली. विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
दरम्यान, शहरातील या ऐतिहासिक विठ्ठल रखुमाई मंदिराचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मंदिर परिसराचा आधुनिकीकरणासोबतच भक्तांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषद प्रशासनाचा मनोदय आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर राम आळीमधील वाहन वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, संपूर्ण बाजारपेठ परिसर यात्रेच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध धार्मिक वस्तूंच्या विक्रेत्यांनी आपापले स्टॉल उभारले असून, खरेदीसाठी रत्नागिरीकरांची मोठी गर्दी उसळली आहे.
रत्नागिरी शहरातील हे विठ्ठल रखुमाई मंदिर अत्यंत पुरातन असून, गेल्या अनेक दशकांपासून कार्तिकी एकादशीला येथे मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा टिकून आहे. या उत्सवाची प्रतीक्षा दरवर्षी भाविक मोठ्या आतुरतेने करतात. यंदाही भक्तीभाव, नामस्मरण आणि उत्साहाने रत्नागिरीने कार्तिकी एकादशी साजरी करून ‘प्रति पंढरपूर’ म्हणून आपली ओळख अधोरेखित केली आहे.

