(रत्नागिरी / प्रतिनिधी)
छातीत दुखत असल्याचे सांगून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नातेवाइकाला फोन करणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला तातडीने उपचारासाठी विविध ठिकाणी नेण्यात आले. मात्र, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. दामु दादु मांजरेकर (वय ६०, रा. मिरवणेवाडी-चाफे, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दामु मांजरेकर यांनी त्यांचे चुलत भाऊ गोपाळ विठ्ठल मांजरेकर यांना फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी येण्याची विनंती केली. त्यानंतर गोपाळ मांजरेकर हे खासगी वाहनाने फणसाडी येथे गेले. तेथून त्यांनी दामु मांजरेकर यांना खासगी वाहनातून जाकादेवी येथील डॉ. पानगले यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दामु मांजरेकर यांची तपासणी केली. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३८/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.०३ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.


