(गुहागर / वार्ताहर)
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या ग्रामविकासातील योगदानाची दखल घेत शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ, कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी खेड येथील भरणे नाका परिसरातील गणेश मंगल कार्यालयात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, लोकनेते वैभवजी खेडेकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उमराठ ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे उपस्थित होते.
उच्चशिक्षित, अभ्यासू आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्त्व असलेले जनार्दन आंबेकर यांनी देशातील नामांकित इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत सेक्शन ऑफिसर म्हणून सेवा बजावली आहे. नियतकालिक सेवानिवृत्तीनंतर ते गुहागर तालुक्यातील उमराठ या आपल्या मूळ गावी स्थायिक झाले. लहानपणापासूनच कोकणातील लाल मातीशी असलेली नाळ आणि समाजकार्याची आवड यामुळे त्यांनी ग्रामविकासात सक्रिय सहभाग घेतला. सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमराठ ग्रामस्थांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली.
सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आंबेकर यांनी ग्रामविकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. गावातील शाळा, अंगणवाड्या, बचत गट, दिव्यांग व्यक्ती, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कामांसाठी मोफत दाखले उपलब्ध करून देणे, शाळा व अंगणवाड्यांना सहकार्य करणे, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे तसेच आरोग्य व कृषीविषयक मेळाव्यांचे आयोजन करणे, अशा विविध माध्यमांतून त्यांनी ग्रामस्थांसाठी काम केले आहे. याशिवाय गावातील पथदिवे, रस्ते आणि इतर सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीनेही आंबेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समाजात पूर्वापार चालत आलेल्या कालबाह्य आणि अनिष्ट रूढी-परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. विशेषतः विधवांशी संबंधित अनिष्ट प्रथा बंद करून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. त्याचबरोबर सर्व पात्र नागरिकांना रेशनवरील धान्य आणि शासकीय पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, साईस दवंडे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर त्यांचा भर असतो. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून गावात विविध विकासकामे व योजना राबविणे, महिला सबलीकरणाला चालना देणे आणि शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या योगदानामुळे उमराठ गावाला आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
जनार्दन आंबेकर यांच्या कार्याची यापूर्वीही विविध संस्थांनी दखल घेतली आहे. सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय आणि ग्रामविकास क्षेत्रातील निःस्वार्थी व भरीव योगदानाबद्दल नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, बेळगाव या संस्थेतर्फे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी बेळगाव येथे त्यांना ‘आदर्श सरपंच’ या आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यानंतर मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीमंच, खेरशेत (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांच्या वतीने १० डिसेंबर २०२३ रोजी ‘स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३’ प्रदान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवभारत वृत्तसमूहाच्या ‘नवराष्ट्र’ या मराठी राष्ट्रीय दैनिकातर्फे २४ डिसेंबर २०२३ रोजी रत्नागिरी येथील सावंत पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरविण्यात आले होते.
ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुधारणा आणि विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या जनार्दन आंबेकर यांच्या कार्याची पुन्हा एकदा जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६’ या सन्मानामुळे उमराठ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पुरस्काराबद्दल सरपंच जनार्दन आंबेकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


