(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कोंडगाव बाईंगवाडी येथे राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मंजूर निधीपैकी तब्बल ८० टक्के रक्कम खर्च झाल्यानंतरही ग्रामस्थांना अद्याप नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संपूर्ण कामाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सक्रिय सदस्य निलेश अशोक सावंत यांनी केली आहे.
शासकीय पोर्टलवरील उपलब्ध माहितीनुसार, कोंडगाव बाईंगवाडी येथील जलजीवन मिशन योजनेसाठी ४० लाख १६ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३३ लाख ८४ हजार रुपये इतका निधी खर्च झाल्याची नोंद आहे. मात्र एवढा मोठा खर्च होऊनही गावातील नळजोडण्यांमधून पाणीपुरवठा सुरू न झाल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. या योजनेअंतर्गत एकूण ८१ नळजोडण्या प्रस्तावित आहेत. प्रत्यक्षात किती जोडण्या पूर्ण झाल्या, किती प्रलंबित आहेत, उर्वरित काम कधी पूर्ण होणार आणि ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा कधी मिळणार, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, या कामाचा सविस्तर हिशोब माहितीच्या अधिकारातून मागवूनही ३५ दिवस उलटल्यानंतरही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही, असा आरोप सावंत यांनी केला आहे. माहिती जाणीवपूर्वक दडपली जात असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी या प्रकरणात काहीतरी गंभीर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेकडे दाद मागण्यात आली असून, जलजीवन मिशनच्या कामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत पाणीप्रश्नाशी संबंधित या योजनेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

