(संगमेश्वर / एजाज पटेल)
देवरुख–संगमेश्वर राज्यमार्गावर लोवले येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वळणावर एलपी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली आणि ट्रक थेट दरीत कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ६२१० क्रमांकाचे एलपी वाहन देवरुखहून संगमेश्वरकडे येत होते. त्याचवेळी चिपळूणहून बॉक्साईट भरून आंबाघाटाच्या दिशेने जाणारा एमएच १० सीआर ३४५६ क्रमांकाचा ट्रक समोरून येत होता. लोवले येथील धोकादायक वळणावर एलपी चालकाने वाहन रस्त्याच्या मधोमध आणल्याने ट्रक चालकाला बाजू घेता आली नाही आणि दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पाच ते सहा फूट खोल दरीत कोसळला. अपघातात एलपी वाहनाच्या केबिनचा चक्काचूर झाला असून चालक बालाजी जलबा कोंडेवार (रा. नांदेड) हा केबिनमध्ये अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जीवाची पर्वा न करता बचावकार्य राबवत चालकाला सुरक्षित बाहेर काढले. या धाडसी प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले.
या अपघातात बालाजी कोंडेवार आणि ट्रक चालक मोहम्मद युसूफ शफी शेख हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
एकाची चूक, दुसऱ्याला शिक्षा
प्रत्यक्षदर्शींच्या मते, ट्रक चालक आपल्याच बाजूने नियंत्रित वेगात जात होता. मात्र एलपी चालकाने वळणाचा अंदाज न घेत वाहन मधोमध आणल्याने हा अपघात घडला. “एकाची चूक आणि दुसऱ्याला शिक्षा” अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, वळणांवर सुरक्षित वाहनचालना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

