( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी येथे सोनवडे संगमेश्वर येथील प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांच्या कलाविषयक मार्गदर्शनासह निसर्गचित्राच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात केवळ निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिकच झाले असे नव्हे, तर दिवसभर कला विषयाच्या विचारांचे मंथन पार पडल्याने उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळे वेगळे समाधान पसरल्याचे पाहायला मिळाले.
मंथन द स्कुल ऑफ आर्ट क्रिएटिव्ह ऍडव्हर्टायझिंग अँड आर्ट, रत्नागिरी यांच्या मंचावर शनिवार ५ एप्रिल रोजी कला संचालनालय महाराष्ट्र राज्य शासनाच्या ६४ व्या कला प्रदर्शनामध्ये राज्य पुरस्कार विजेते प्रसिद्ध निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांची एक दिवसीय कला कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली. मंथन आर्ट स्कुल रत्नागिरीचे प्रमुख संदेश पालये यांनी मंथनच्या विविध उपक्रमांची यावेळी सविस्तर माहिती दिली. मंथन मध्ये केवळ कलेचे शिक्षण दिले जाते असे नव्हे, तर येथे प्रत्येक दिवशी विचारांचे मंथन होते. या विचार मंथनाच्या जोरावर विद्यार्थी कलानिर्मिती करत असतात असे पालये यांनी नमूद केले .
यावेळी नंदकुमार यादव सर यांच्या हस्ते निसर्ग चित्रकार विष्णू परिट यांचा शाल, रोपटे आणि मंथन ची ओळख असणारी डायरी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंथनचे रत्नागिरी शाखाप्रमुख प्रा. संदेश पालये, प्रा. प्रतीक्षा पांचाळ, शिक्षक नेते विनायक हातखंबकर, संतोष गोरीवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंथन आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांसह या कार्यशाळेला नोंदणी केलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
कार्यशाळेत आपले मनोगत व्यक्त करताना चित्रकार विष्णू परीट म्हणाले की, यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली सुंदर कामं मला पहायला मिळाल्याने माझ्या मनाचे समाधान झाले . विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कलाकृती समजावून सांगताना विद्यार्थ्यांमध्ये संवाद – कौशल्य दिसून आले. कार्यशाळेची सर्व असलेली तयारी विद्यार्थी मनापासून करताना दिसले. कार्यशाळेसाठी नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, चिंतन आणि मनन यातून विद्यार्थ्यांनी केलेल्या अनेक जाहिराती जवळून पाहला आल्या. नीटनेटकी मांडणी, व कलाअध्ययनासाठी योग्य भौतिक सुविधा याकडे संस्थेचे जाणीवपूर्वक लक्ष आहे, हे प्रामुख्याने दिसून आले . सध्याच्या डिजीटल युगात लेखन केला कुठे तरी मागे पडल आहे, असे वाटत असताना. मंथनची डायरी व त्यातील मुलांनी स्वतः केलेले लेखन, कविता व त्याला समर्पक अशी रेखाटने मला खूपच भावली. ही डायरी दररोज एक थीम घेवून विद्यार्थी व शिक्षक दररोजी ती पाहूनच – त्या दिवसाचे काम सुरु होते हे नक्कीच अभिनंदन या आहे . महाराष्ट्रातील ५० हुन अधिक पुरस्कार मिळवलेली जाहिरात क्षेत्रातील ही संस्था. अनुभवी, अभ्यासू व समर्पणाने ज्ञानदान करणारा इथला प्राध्यापक वर्ग खऱ्या अर्थाने मुलांच्या करिअर विषयी जागरुक आहे. गुरुकुल पध्दतीच्या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ शिक्षकांच्या सानिध्यात राहून शिक्षण घेत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनाअँपलाईड आर्ट क्षेत्रात करीअर करायचे असेल तर त्यांना मंथन हा उत्तम पर्याय आहे असे चित्रकार विष्णू परीट यांनी आवर्जून नमूद केले.
दिवसभर संपन्न झालेल्या या कलाकार्य शाळेत चित्रकार विष्णू परीट यांच्या प्रात्यक्षिकाबरोबरच विद्यार्थ्यांसमवेत दुहेरी संवादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना परीट यांनी समाधानकारक उत्तरे दिली. एकूणच कार्यशाळेचा संपूर्ण कार्यक्रम विविध प्रकारच्या मंथनांनी संपन्न झाल्याबद्दल आर्ट स्कूलचे संदेश पालये आणि प्रतीक्षा पांचाळ यांनी चित्रकार विष्णू परीट यांना धन्यवाद दिले.

