(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथील कु. समृद्धी सयोजिता सुरेश आंबेकर हिने एसएससी बोर्ड परीक्षेत तब्बल ९९.२० टक्के गुण मिळवत गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत उमराठ आणि उमराठ ग्रामस्थांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत उमराठच्या विशेष सभेत हा सत्कार सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे प्रशासक जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते समृद्धीचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके, पेनसेट तसेच पर्यावरणपूरक संदेश म्हणून वृक्षरोप देऊन गौरव करण्यात आला.
तसेच उमराठ ग्रामस्थांच्या वतीने गावचे मानकरी अनिल पवार आणि पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले यांच्या हस्तेही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
स्वअध्ययनातून घवघवीत यश
पाटपन्हाळे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या समृद्धीने कोणतीही खासगी शिकवणी न लावता केवळ स्वअध्ययनाच्या जोरावर हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नियमित अभ्यास, लेखन सराव, उजळणी, मनन आणि चिंतन यांच्या माध्यमातून हे यश मिळाल्याचे समृद्धीने सांगितले.
अष्टपैलू विद्यार्थिनी
समृद्धी आंबेकर ही केवळ अभ्यासातच नव्हे, तर विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही आघाडीवर राहिली आहे. वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, क्रीडा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि विज्ञान प्रतिकृती सादरीकरण अशा विविध तालुका व विभागस्तरीय स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. तिला ‘चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार’ तसेच ‘प्रा. जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार’ मिळाला आहे.
“आयएएस होऊन समाजसेवा करायची”
मनोगत व्यक्त करताना समृद्धीने भविष्यात आयएएस अधिकारी बनून समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या यशामागे आई-वडील, आजी-आजोबा, गुरुजन आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे तिने नमूद केले.
ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव
उमराठचे प्रशासक जनार्दन आंबेकर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले आणि गावचे मानकरी अनिल पवार यांनी समृद्धीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “भविष्यात आयएएस अधिकारी बनून उमराठ गावाचे नाव अधिक समृद्ध करावे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे तसेच कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि साईस दवंडे यांनी विशेष सहकार्य केले.

