(नरवण / सचिन कुळये)
धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळ, नरवण यांच्या वतीने श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. गावकरी, भाविक आणि मान्यवरांच्या सहकार्याने हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगल वातावरणात पार पडला.
गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता श्रींचा अभिषेक व काकड आरतीने माघी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजता ह.भ.प. श्री चिंतामणी निमकर बुवा (पुणे) यांच्या प्रभावी कीर्तन प्रवचनाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दुपारी १२.४५ वाजता श्री गणेश जन्मकाळ सोहळा मोठ्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला.
सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी मिरवणूक नरवण गाव बाजारपेठेतून मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत गावातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आजूबाजूच्या गावांतील भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दुपारच्या सत्रात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री ८.३० ते १० वाजेपर्यंत सुस्वर भजने आणि भक्तिगीते सादर करण्यात आली. भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाचे गुणगान करत माघी गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण उत्सवाचे नियोजन धनावडेवाडी नवतरुण उत्साही मंडळ व महिला मंडळाच्या सदस्यांनी केले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत, भाविकांसाठी व्यवस्था आणि कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. माघी गणेशोत्सवाने गावात भक्ती, एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

