(खेड /रत्नागिरी)
तालुक्यातील संगलट परिसरातून २४ वर्षीय तरुण रात्रीच्या सुमारास वाहन घेऊन घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीम कलाम नाडकर (वय २४, रा. संगलट मोहल्ला, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे १ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास संगलट-ओवळी स्टॉप येथून वाहन घेऊन निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र हमीम नाडकर यांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर त्यांची पत्नी फिरदोस हमीम नाडकर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पती बेपत्ता झाल्याच्या पार्श्वभूमीवर अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असावे, असा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
या प्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी दाखल करण्यात आला. बेपत्ता हमीम नाडकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, त्यांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


