(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी कडक उन्हाचा तडाखा आणि अधूनमधून बरसणाऱ्या तुरळक सरी अशा बदलत्या हवामानामुळे रत्नागिरीकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत. जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने उष्णता आणि उकाड्याचा कहर वाढला असून, रविवारी सकाळी कोसळलेल्या किरकोळ सरींनी नागरिकांना काहीसा दिलासा दिला.
यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने कोकणात दाखल होत समाधानकारक पाऊस दिला होता. त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवल्याने वातावरणात उकाडा वाढू लागला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांची अक्षरशः काहिली होत असून, अनेक भागांतील विहिरी, ओढे आणि अन्य जलस्रोतही आटण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी काही ठिकाणी पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. सकाळी आकाशात काळे ढग दाटून आल्याने पावसाच्या आशा पल्लवित होतात. मात्र काही वेळातच ढग विरळ होऊन सूर्याचा प्रखर तडाखा जाणवू लागतो. त्यामुळे हवामानातील या लपंडावामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. उष्णतेमुळे बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवरील वर्दळही काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी रत्नागिरी शहरासह काही भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अधूनमधून झालेल्या विजांच्या कडकडाटाने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र हा दिलासा तात्पुरताच ठरला असून, जिल्हावासीयांच्या नजरा आता समाधानकारक पावसाकडे लागल्या आहेत.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे. जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर अनेक ठिकाणी पेरण्या उरकण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून, बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.

