(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला स्कायवॉक सध्या वापराविना पडून असल्याने त्याच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याच स्कायवॉकचे पुन्हा लाखो रुपये खर्च करून ‘हँगिंग आर्ट गॅलरी’मध्ये रूपांतर आता चर्चेत आले आहे. रस्त्यावरील स्कायवॉकवर होणारी ही पहिलीच हँगिंग आर्ट गॅलरी आहे. या प्रकल्पावरून स्थानिक राजकारणात आणि नागरिकांमध्ये संमिश्र चर्चा व टीका-टिप्पणी सुरू आहे.
माळनाका परिसरातील विद्यार्थ्यांची वाहतूक आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा स्कायवॉक उभारण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याने टीका होत होती. अनेक वर्षांपासून स्कायवॉकचा वापर अत्यल्प असून, तो विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी कितपत उपयुक्त ठरला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेवर आर्थिक भार असताना ‘हँगिंग आर्ट गॅलरी’ चे निमित्त साधून शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आधीच वापरात नसलेल्या स्कायवॉकवर आणखी खर्च करून त्याचे आर्ट गॅलरीत रूपांतर करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याचा नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देण्याऐवजी अशा प्रकल्पांवर खर्च करण्याबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. स्कायवॉकच्या आर्ट गॅलरीतील रूपांतराचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा खर्च, देखभाल, भविष्यातील वापर आणि नागरिकांना होणारा प्रत्यक्ष फायदा याबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी स्थानिक नागरिक आणि राजकीय क्षेत्रातूनही तीव्र आक्षेप घेतला जात असून, जनतेच्या पैशांचा योग्य वापर झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली जात आहे. आर्ट गॅलरीचा प्रकल्प पुढे रेटत शहराच्या सुशोभीकरणाच्या नावावर जनतेच्या पैश्यांची होणारी लूट यापुढे थांबली नाही आणि या तथाकथित “आर्ट गॅलरीचा” हा अट्टाहास यशस्वी झाला नाही तर प्रशासनाला रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिला आहे.
त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्कायवॉकचा सध्याचा वापर, त्याच्या देखभालीवर झालेला खर्च आणि प्रस्तावित आर्ट गॅलरीसाठी लागणारा निधी याबाबत रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

