(गणपतीपुळे / वैभव पवार)
सैतवडे येथील बौद्धजन पंचायत आदर्श महिला मंडळ तसेच त्रिसरण फाउंडेशन ट्रस्ट, मुंबई यांच्या सदस्या व महिला ऑडिटर ॲड. दिपाली रुपेश पवार यांनी एकाच वर्षात विधी पदवी (एलएलबी) आणि ऑल इंडिया बार कौन्सिलची (AIBE) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
दिपाली पवार या दिवंगत कायदेविषयक सल्लागार रुपेश रामदास पवार यांच्या पत्नी आहेत. पत्नीने वकील व्हावे, असे स्वप्न रुपेश पवार यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या निधनानंतर अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक संकटांना सामोरे जात दिपाली पवार यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले.
या कठीण काळात त्यांची मुले जयेश आणि ह्रिथ्वी यांनी आईला खंबीर साथ दिली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने शिक्षणात खंड पडू दिला नाही. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही संपूर्ण कुटुंबाने त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
मुलगी ह्रिथ्वी आजारी असताना रुग्णालयात रात्रभर अभ्यास करून दुसऱ्या दिवशी त्या परीक्षेला जात होत्या. स्वतःची प्रकृतीही ठीक नसतानाही त्यांनी अभ्यास आणि परीक्षा यांना प्राधान्य दिले. त्यांच्या आजारपणात सासरे रामदास शंकर पवार यांचे तसेच आई-वडिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा पूर्वी सहा महिन्यांच्या अंतराने होत असे. मात्र यावर्षी अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. कठीण प्रश्नपत्रिका आणि प्रतिकूल प्रकृती असूनही त्यांनी जिद्दीने परीक्षेला सामोरे जात यश संपादन केले. त्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र शिक्षणात खंड पडू नये यासाठी ॲड. रूपाली मोरे आणि ॲड. थॉमस सर यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
जिद्द, चिकाटी आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल ॲड. दिपाली रुपेश पवार यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

