(राजापूर /रत्नागिरी)
तालुक्यातील नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर धारदार कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी स्वप्निल अशोक बिर्जे (वय ४०, रा. बेनगी, पो. आडिवरे, ता. राजापूर) याच्याविरुद्ध नाटे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जुवाटी (ता. राजापूर) येथील रहिवासी आणि सध्या विरार येथे व्यवसाय करणारे किशोर दिवाकर मयेकर (वय ३७) हे २ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या भावोजींच्या घरासमोरील फणसाच्या झाडाखाली मित्रांसोबत उभे होते. यावेळी संशयित स्वप्निल बिर्जे तेथे आला. त्याने मागून येत मयेकर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात मयेकर यांच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणी जखमी किशोर मयेकर यांनी नाटे सागरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१) आणि ११५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास नाटे सागरी पोलिसांकडून सुरू आहे.


