(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
घर बंद असल्याची संधी साधून मागील दरवाजा तोडत घरात प्रवेश करून सुमारे २० हजार रुपयांचे तांबे, पितळ व स्टीलचे साहित्य लंपास केल्याची घटना कोळकेवाडी येथे घडली. चोरीबाबत विचारणा करणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेला शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराजवळ राहणाऱ्या सुभद्रा सुधाकर कदम (वय ७०) यांच्या बंद घराला चोरट्याने लक्ष्य केले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ या कालावधीत घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. घरात कोणी नसल्याची खात्री करून घरातील वापरातील धातूची भांडी लंपास करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या चोरीत सुमारे १२ हजार रुपये किमतीचे तांब्याचे चार मोठे हंडे व तीन कळश्या, सात हजार रुपये किमतीचे पितळेचे दोन मोठे टोप व तीन मोठ्या बादल्या आणि एक हजार रुपये किमतीच्या स्टीलच्या तीन लहान बादल्या, असे एकूण सुमारे २० हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेने याबाबत विचारणा केली असता, गणेश प्रकाश कदम (वय ४०, रा. कोळकेवाडी) याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यासाठी अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुभद्रा कदम यांनी अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित संशयिताविरुद्ध यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३०५, ३३१(३), ३३१(४), ३५२ आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलिस करीत आहेत.


