(मुंबई / वृत्तसंस्था)
दातांसाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम कवळ्या आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारींनी राज्यात चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे, पाच रुपयांची नाणी वितळवून त्यातील धातूपासून दातांच्या कवळ्या तयार केल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या साहित्यामुळे रुग्णांच्या तोंडातील त्वचेला त्रास होणे, सूज येणे तसेच अॅलर्जी उद्भवण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने दंत प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. ६ नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार या क्षेत्रावर अधिक कडक नियंत्रण ठेवण्यात येणार असून, अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) संबंधित प्रयोगशाळांची तपासणी केली जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाकडे २०१४ पासून दंत उपकरणांच्या निर्मितीसंदर्भात ३५० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अपात्र व्यक्तींकडून दातांची उपकरणे तयार करणे आणि त्यासाठी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होणे, असे गंभीर मुद्दे या तक्रारींमध्ये मांडण्यात आले आहेत. राज्यात सुमारे ६६ हजार नोंदणीकृत दंतवैद्य आहेत; मात्र अधिकृत पात्रता असलेल्या दंत तंत्रज्ञांची संख्या केवळ १,२०० च्या आसपास आहे. प्रशिक्षित तंत्रज्ञांची मर्यादित संख्या आणि दंत प्रयोगशाळांवरील अपुरे नियंत्रण यामुळे काही ठिकाणी अप्रशिक्षित व्यक्तींकडून दंत उपकरणे तयार केली जात असल्याचे समोर आले आहे.
पाच रुपयांच्या नाण्यांमध्ये निकेल ब्रास हा धातू वापरला जातो. त्यात ७५ टक्के तांबे, २० टक्के जस्त आणि ५ टक्के निकेल असते. यातील काही धातूंचा वापर अधिकृतरीत्या तयार केल्या जाणाऱ्या दंत साहित्यामध्येही केला जातो. मात्र, त्यासाठी धातूची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासली जाते. नाण्यांमधील धातू दातांच्या उपचारांसाठी तयार केलेला किंवा त्यादृष्टीने तपासलेला नसतो. त्यामुळे नाणी वितळवून अनियंत्रित पद्धतीने तयार केलेल्या कवळीतील धातूची गुणवत्ता आणि सुरक्षितता हा चिंतेचा विषय ठरत आहे.
अशा प्रकारच्या धातूपासून तयार केलेली कवळी तोंडातील लाळ आणि इतर घटकांच्या संपर्कात आल्यावर तिची झीज होऊ शकते. त्यातून काही घटक बाहेर पडल्यास तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. काही रुग्णांना अॅलर्जी, जळजळ किंवा सूज येऊ शकते. निकृष्ट दर्जाच्या किंवा अयोग्य पद्धतीने बनवलेल्या कवळ्या दातांवर व्यवस्थित बसत नाहीत आणि त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच कवळीखालील मूळ दाताला किड लागण्याचाही धोका असतो. त्यामुळे दंत उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा आणि सुरक्षितता महत्त्वाची ठरते.
या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने नव्या नियमावलीत दंतवैद्य आणि दंत तंत्रज्ञ यांच्या कामाची जबाबदारी स्पष्ट केली आहे. रुग्णाची तपासणी करणे, आजाराचे निदान करणे, उपचार निश्चित करणे आणि कोणत्या प्रकारची कवळी किंवा उपकरण आवश्यक आहे, हे ठरवण्याचे काम दंतवैद्यांकडे असेल. दंत तंत्रज्ञांना डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसारच कवळी, कृत्रिम दात, डेंचर, ब्रिज आणि अन्य उपकरणे तयार करता येतील. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा उपकरणांच्या निर्मितीला परवानगी नसेल.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना रुग्णांना दर्जेदार साहित्य मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी दंतवैद्यांनीही दक्षता घेऊन रुग्णांवर उपचार करताना योग्य दर्जाच्या साहित्याचाच वापर करावा, असे त्यांनी नमूद केले आहे.


