(नंदुरबार / वृत्तसंस्था)
खान्देशातील अहिराणी नाट्य, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या विनोदी अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे हास्यकलाकार विजय दगडू पवार यांचे १७ नोव्हेंबर रोजी मंगळवारी पहाटे चार वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने नंदुरबारसह संपूर्ण खान्देशातील सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते अहिराणी कलाविश्वात कार्यरत होते. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंतचा त्यांचा प्रवास सुरू असतानाच मोठ्या पडद्यावर झळकण्याचे स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.
धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील रहिवासी असलेल्या विजय पवार यांची नंदुरबारमध्ये हास्यकलाकार म्हणून विशेष ओळख होती. विविध एकपात्री प्रयोग आणि नाटकांमधील त्यांच्या अभिनयामुळे खान्देशासह विदेशातही त्यांचा चाहता वर्ग निर्माण झाला होता. अभिनयाची उपजत क्षमता असलेल्या पवार यांनी नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निवृत्तीला दोन वर्षे बाकी होती. मात्र, त्यांनी कायम विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम केले.
शिक्षकी पेशा सांभाळतानाही त्यांच्यातील कलाकार सतत सक्रिय होता. अहिराणी साहित्य संमेलने, काव्य संमेलने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना आवर्जून निमंत्रित केले जात असे. कविता सादर करणे, एकपात्री प्रयोग करणे आणि विनोदी अभिनयातून रसिकांचे मनोरंजन करणे हा त्यांचा आवडता छंद होता. साहित्य संमेलनात त्यांनी सादर केलेली ‘जवाई देखो तवा येतो अशीच करत’ ही अहिराणी कविता विशेष गाजली. सहजसुंदर सादरीकरण आणि विनोदाची स्वतंत्र शैली ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये होती.
नंदुरबार येथील डॉक्टरांनी तयार केलेल्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. अहिराणी नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. अभिनयाची क्षमता असूनही मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी त्यांना अपेक्षेइतकी मिळाली नाही, अशी खंत होती. प्रादेशिक भाषेतील कलाकार म्हणून त्यांची ओळख मर्यादित राहिली आणि मोठ्या पडद्यावर झळकण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.
विजय पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील आईविषयीचे प्रेमही विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या आईच्या पायांना गंभीर दुखापत झाल्यानंतर दोन्ही पाय कापावे लागले होते. या घटनेनंतर पवार यांनी स्वतः चप्पल घालणे सोडून दिले. आईच्या निधनानंतरही त्यांनी अनवाणी चालणे सुरूच ठेवले. आईविषयीची अपार माया त्यांच्या या कृतीतून दिसून येत होती.
निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबतही त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, नाटके आणणे आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काम करणे, असे त्यांचे नियोजन होते. आपल्या कलेच्या माध्यमातून मानधन मिळवण्याची त्यांची इच्छा होती. निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील काम यांच्या आधारावर आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याची त्यांची तयारी होती. मात्र, या योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्यांची जीवनयात्रा थांबली.
ज्येष्ठ अहिराणी चित्रपट दिग्दर्शक ईश्वर माळी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करून विजय पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. खान्देशातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवतानाच अभिनयाच्या माध्यमातून हजारो रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या कलाकाराच्या अकाली निधनाने अहिराणी नाट्य, साहित्य आणि चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाल्याची भावना कलाकार, प्रेक्षक आणि चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.


