(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), रत्नागिरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. दहावी नंतरच्या शिक्षणाच्या दिशा, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी आयटीआय रत्नागिरीचे तज्ज्ञ मार्गदर्शक संतोष पावसकर आणि एस. व्ही. सांगळे उपस्थित होते. शालेय विद्यार्थिनींनी तयार केलेल्या सुबक पुष्पगुच्छांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागताची भूमिका प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संतोष चव्हाण आणि कलाध्यापक रमेश गंधेरे यांनी पार पाडली.
मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी आयटीआयमध्ये उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम, त्यामधून निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधी आणि रोजगाराच्या शक्यता याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे, विविध कॅटेगरीनुसार प्रवेशाची पद्धत, ड्रॉईंग ग्रेड परीक्षा, तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रमाणपत्रांचा प्रवेश व पुढील संधींसाठी होणारा लाभ याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे आयटीआय रत्नागिरीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपी आणि स्पष्ट झाली.
आयटीआयच्या माध्यमातून भविष्यात सरकारी व खासगी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींबाबत माहिती देत, विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शकांनी केले. या करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक संतोष चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नसिम शेकासन, कलाध्यापक रमेश गंधेरे, विज्ञान शिक्षिका संज्योत खेडेकर, शोझब चिकटे, रविंद्र लवंदे तसेच विद्यार्थी वर्गाने मोलाचे सहकार्य केले. यामध्ये ओमकार कदम (इयत्ता दहावी) यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली, तर अनुराग महाकाळ (इयत्ता नववी) यांनी प्रोजेक्टर संचालन केले.
शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडेचे अध्यक्ष सज्जाद अ. करीम सय्यद, सचिव समीर अ. रज्जाक सय्यद आणि खजिनदार वहाबभाई खलपे तसेच सर्व सदस्यांनी आयटीआय रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपयुक्त करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

