(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) या तरुणास अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ८८ ब्राऊन शुगरच्या पुड्या व एक मोटारसायकल असा सुमारे १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई २५ जून रोजी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या दिवशी माळनाका ते एस.टी. कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला एका मोटारसायकलवर बसलेला संशयित इसम दिसून आला. पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील पिशवीत ब्राऊन शुगर सदृश अमली पदार्थाच्या ८ ग्रॅम वजनाच्या ८८ पुड्या आढळून आल्या.
पंचांसमक्ष या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडील अमली पदार्थ (एकूण ₹४४,००० किंमतीचा) आणि एक मोटारसायकलसह एकूण ₹१.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईसाठी संशयित आरोपीस रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पो.उपनिरीक्षक शेषराव शिंदे, स.पो.फौजदार सुभाष भागणे, पो.ह.वा. शांताराम झोरे, बाळू पालकर, अमित कदम, गणेश सावंत, प्रवीण खांबे, सत्यजीत दरेकर या पोलिसांनी केली.