(चिपळूण)
चिपळूण शहर व परिसरात आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूररेषांमुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. गाळ काढल्याने नदीपात्राची पूर वाहन क्षमता आणि भौगोलिक परिस्थितीत बदल झाला आहे. त्यामुळे चिपळूणसाठी जटिल बनलेल्या पूररेषेच्या फेरसर्वेक्षणाची मागणी आमदार शेखर निकम यांनी केली होती. त्याप्रमाणे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
येथील वाशिष्ठी व शिवनदीला जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे चिपळूण शहरासह परिसरात दाणादाण उडाली होती. याबाबतच्या अहवालानंतर वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ व बेटे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. हा गाळ काढण्यापूर्वीच शहर व परिसरात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निळ्या व लाल पूररेषेचे सीमांकन करण्यात आले आहे. मात्र, ही पूररेषा चिपळूणच्या विकासात अडसर ठरत आहे.
गत सप्ताहात आमदार शेखर निकम यांनी बचाव समितीचे राजेश वाजे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासमवेत जलसंपदामंत्री महाजन यांची भेट घेतली. या भेटीत २०२१ मध्ये आखण्यात आलेली पूररेषा, त्यानंतरचा महापूर, गाळ उपसा, कमी झालेली पुराची तीव्रता, याबाबत चर्चा करत वाशिष्ठी व तिच्या उपनद्यांचे फेर सर्वेक्षणाची मागणी केली. महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेत तत्काळ अपर मुख्य सचिवांना हे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
तीन वर्षापासून मागणी
वाशिष्ठी व उपनदीमधील गाळ काढल्यामुळे नदीपात्रात पूर वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये व भौगोलिक परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे निळ्या व लाल पूररेषेची फेर सर्वेक्षणाची मागणी गेल्या तीन वर्षांपासून जोर धरत आहे.