(संगमेश्वर / प्रतिनिधी)
अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात शेवटच्या निर्णायक चढाईत बोनस गुण मिळवत संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादासाहेब सरफरे विद्यालय, शिवने-बुरंबीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने बलाढ्य रत्नागिरी संघावर मात केली. या विजयासह जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सरफरे विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून, संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच रत्नागिरी संघाने सरफरे विद्यालयाच्या संघावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सामन्यात सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली.
दरम्यान, अथर्व गेल्येच्या धडाकेबाज चढायांमुळे सरफरे विद्यालयाच्या संघाने मध्यंतरानंतर सामन्यात पुनरागमन करण्यास सुरुवात केली. मात्र, शेवटच्या पाच मिनिटांपूर्वीही रत्नागिरी संघाकडे तब्बल दहा गुणांची आघाडी होती. त्यामुळे सामना रत्नागिरीच्या बाजूने झुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच निर्णायक टप्प्यावर अथर्व गेल्ये, रुद्र बोथले आणि यश पड्याळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सरफरे संघाला सामन्यात पुन्हा आणले.
शेवटच्या पाच मिनिटांत सरफरे विद्यालयाच्या संघाने रत्नागिरीवर लोण देत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्यानंतर अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरस कायम राहिली. या सामन्यात सरफरे विद्यालयाच्या संघाकडे शेवटची चढाई करण्याची संधी होती. काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना वेळ काढणे महत्त्वाचे असल्याचे कबड्डी प्रशिक्षक शिक्षक सुहास पाब्ये यांनी अथर्वला सांगितले होते.
अथर्वने प्रशिक्षकांनी दिलेला कानमंत्र अचूकपणे अंमलात आणला. त्याने सुरुवातीचे १२ ते १५ सेकंद शांत डोक्याने वेळ काढला आणि त्यानंतर वेग घेत चढाई करत बोनस गुण मिळवला. अथर्वच्या या निर्णायक बोनस गुणामुळे संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरफरे विद्यालयाच्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. बलाढ्य रत्नागिरी संघाला पराभव स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या संघाने गतवर्षीच्या विजेत्या दापोली संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. दुसऱ्या उपांत्य फेरीत रत्नागिरी संघाने खेड संघावर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
जिल्हास्तरीय स्पर्धेत शानदार विजय मिळवून विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या सरफरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सुरज जाधव आणि सुनिल पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई, जनरल सेक्रेटरी शरद गोविद बाईत, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक सचिन सीताराम मोहिते व सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे कौतुक केले.


