(पंढरपूर / वृत्तसंस्था)
कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात गोळीबाराची गंभीर घटना घडली असून, शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ हा हल्ला झाला. घराबाहेर पडताच मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले.
या गोळीबारात भिंगे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. इसबावी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, पंढरपूरमधील नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या हत्या प्रकरणात राजाभाऊ भिंगे यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात त्यांनी सात ते आठ वर्षे कारागृहात घालवली होती. वर्षभरापूर्वी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. त्यानंतर त्यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले होते.
कार्तिक वारीच्या तोंडावर शहरात घडलेल्या या गोळीबार आणि हत्येच्या घटनेमुळे पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.


